श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी ॥६॥